US Open 2022 : सेरेनाची यशस्वी सुरुवात तर त्सित्सिपासला पराभवाचा धक्का

न्यूयॉर्क – अमेरिकेची अनुभवी महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने (Serena Williams) आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत (US Open 2022) यशस्वी सुरुवात केली. तिने पहिल्या फेरीच्या लढतीत मॉन्टेनेगरीयन दान्का कोव्हीनिकवर 6-3, 6-3 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली व (Serena Williams through to second round) दुसरी फेरी गाठली.
पुरुष एकेरीत मात्र संभाव्य विजेता समजल्या जात असलेल्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासला (Stefanos Tsitsipas) पराभवाचा धक्का बसला. (Stefanos Tsitsipas is stunned by Daniel Galan in the US Open first round) त्याला पहिल्याच फेरीच्या सामन्यात कोलंबियाच्या डॅनिल गलानकडून 6-0, 6-1, 3-6, 7-5 असा पराभव पत्करावा लागला.
चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रेझीकोव्हीनेही विजयी सलामी देताना मेक्सिकोच्या फर्नांडा गोमेझवर 6-0, 6-4 अशी मात केली. पहिल्या फेरीच्या सामन्यात ग्रीसच्या मरीया सकारीने जर्मनीच्या तात्जना मारियावर 6-4, 3-6, 6-0 असा विजय मिळवला.
या फेरीत सर्वात सनसनाटी निकाल नोंदवताना युक्रेनच्या दारिया स्निगुरने संभाव्य विजेती मानल्या जात असलेल्या सिमोन हालेपचा 6-2, 0-6, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियॉसने अपेक्षित विजयी सलामी देताना आपल्याच देशाच्या थान्सी कोकीनाकीसवर 6-3, 6-4, 7-6 अशी मात केली.





