विलगीकरण बेड्स 10 हजारांवर

शिक्षण संस्थांच्या रिकाम्या हॉस्टेलमध्ये सुविधा
पुणे – करोना बाधित अकरा देशांतून आलेल्या नागरिकांना 24 तास विलगीकरण कक्षात ठेवण्याचे बंधन केंद्राने घातले आहे. त्यामुळे अशा नागरिकांना विलगीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागा लागणार आहे. हे विचारात घेऊन विद्यार्थी निघून गेल्यामुळे रिकामे झालेले हॉस्टेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिक्षण संचालकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत 26 शिक्षण संस्थांनी 5 हजार 24 व्यक्तींची विलगीकरण करून ठेवता येईल, एवढी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, गरज पडल्यास दहा हजार नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवता येईल, हा विचार करून आम्ही व्यवस्था निर्माण करीत आहोत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
करोना रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नव्याने सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार परदेशातून आलेल्या नागरिकांना किमान 24 तास विलगीकरण कक्षात बंधन घालण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपयोजना सुरू केल्या असून त्यासाठी खासगी शिक्षण संस्थांची मदत घेणार आहे. याविषयी जिल्हाधिकारी राम म्हणाले, “भविष्याचा विचार करता दहा हजार नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवावे लागेल, हे गृहीत धरून आम्ही व्यवस्था निर्माण करीत आहोत.
आतापर्यंत 26 शिक्षण संस्थांमध्ये रिकामे झालेले हॉस्टेल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तेथे परदेशातून येणाऱ्या नागरिकांना ठेवण्यात येणार आहे. एका विमानातून 190 नागरिक येतात. 27 तारखेनंतर एअर इंडियाची विमानसेवा सुरू होत आहे. याचा विचार करून ही सुविधा निर्माण करण्यात येत आहे.’
“होम क्वॉरंटाइन’चा शिक्का मारणार
परदेशांतून मुंबई विमानतळावर उतरणारे प्रवासी अन्य शहरांत रस्ते, रेल्वे अथवा एसटीच्या माध्यमातून प्रवास करतात. ते टाळण्यासाठी मुंबई विमानतळावर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. लोहगाव विमानतळावर येणाऱ्यांनाही विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. यावेळी या प्रवाशांच्या तपासणीच्या अहवालानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवायचे का? घरी सोडायचे याचा निर्णय घेण्यात येईल. तेथून सोडल्यानंतर त्यांच्या हातावर “होम क्वॉरंटाइन’चा शिक्का मारण्यात येणार आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.



