Stock Market : ‘या’ कारणामुळे सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी घसरले; गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
Stock Market : पश्चिम आशियातील तणावाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला. सेन्सेक्स 460 अंकांनी, तर निफ्टी 123 अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांची संपत्ती ₹3.98 लाख कोटींनी कमी झाली.

Stock Market : पश्चिम आशियातील वाढलेल्या तणावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर गुरुवारी दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. बाजारात दिवसभर मोठी विक्री झाली. यामुळे बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य जवळपास ₹4 लाख कोटींनी कमी झाले.
गुरुवारी (22 ऑक्टोबर) सेन्सेक्स 460.30 अंकांनी म्हणजेच 0.62 टक्क्यांनी घसरून 73,249.39 अंकांवर बंद झाला. निफ्टी 123.70 अंकांनी म्हणजेच 0.54 टक्क्यांनी घसरून 22,687.65 अंकांवर स्थिरावला. दिवसभरात सेन्सेक्स 704.58 अंकांनी घसरून 73,005.11 आणि निफ्टी 256.50 अंकांनी घसरून 22,554.85 अंकांपर्यंत खाली आला होता.
सौदी अरामकोवरील ड्रोन हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी विक्री झाली. निफ्टी मिडकॅप 100 जवळपास एक टक्का, तर निफ्टी स्मॉलकॅप 100 एक टक्क्यांहून अधिक घसरला.
गुंतवणूकदारांचे ₹3.98 लाख कोटी कमी
21 ऑक्टोबरला बीएसईवरील सर्व कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ₹4,62,37,678.67 कोटी होते. 22 ऑक्टोबरला ते कमी होऊन ₹4,58,39,392.70 कोटी झाले. म्हणजेच एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹3,98,285.97 कोटींची घट झाली.
आयटी, एफएमसीजी, ऑटो शेअर्सवर दबाव
सेक्टरनुसार पाहता आयटी निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक, एफएमसीजीमध्ये सुमारे दीड टक्का आणि ऑटो क्षेत्रात अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरण झाली. मात्र पीएसयू बँक आणि फार्मा क्षेत्रातील निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्समधील 11 शेअर्स वाढले
सेन्सेक्समधील 30 पैकी 11 शेअर्समध्ये वाढ झाली. बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयसीआयसीआय बँक यांच्या शेअर्समध्ये तुलनेने चांगली वाढ झाली.
बीएसईवर गुरुवारी एकूण 5,565 शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी 1,462 शेअर्स वाढले, तर 2,873 शेअर्स घसरले. 230 शेअर्सच्या किमतीत बदल झाला नाही. 59 शेअर्सनी वर्षभरातील उच्चांक, तर 487 शेअर्सनी वर्षभरातील नीचांकी पातळी गाठली. आठ शेअर्स अपर सर्किट, तर 42 शेअर्स लोअर सर्किटला पोहोचले.
कच्च्या तेलाचे भाव वाढले, रुपया घसरला –
सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे ब्रेंट क्रूड कच्चे तेल आज ३ टक्क्यांहून अधिक वाढून ११२.३३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. यामुळे निर्माण झालेला जागतिक बाजारपेठेतील तणाव आणि देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीमुळे रुपया ४४ पैशांनी घसरून ९४.८२ प्रति युएस डॉलरवर बंद झाला.





