Stock Market: शेअर बाजार सपाट पातळीवर बंद, मिड कॅप आणि स्मॉल कॅप नव्या उच्चांकावर

Stock Market Closing Updates: भारतीय शेअर बाजारासाठी बुधवारचे ट्रेडिंग सत्रही चांगले राहिले. छोट्या आणि मध्यम शेअरमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे निफ्टीचा मिड कॅप – स्मॉल कॅप निर्देशांकाने आजच्या व्यवहारात विक्रमी उच्चांक गाठला आहे. सरकारी बँकांच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली आहे. आजच्या व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 34.09 अंकांनी किंवा 0.05 टक्क्यांनी घसरून 72,152.00 वर बंद झाला आणि निफ्टी 1.10 अंकांनी किंवा 0.01 टक्क्यांनी वाढून 21,930.50 वर बंद झाला.
मार्केट कॅप विक्रमी उच्च पातळीवर –
आजच्या सत्रात शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांच्या मार्केट कॅपने नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य 389.65 लाख कोटी रुपयांवर पोहोचले जे मागील सत्रात 386.83 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.82 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान, आजच्या व्यवहारात निफ्टी मिड कॅप निर्देशांक 49,430 अंकांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला तर स्मॉल कॅप निर्देशांक 16,653 अंकांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला. याशिवाय बँकिंग, फार्मा, एफएमसीजी, धातू, मीडिया, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअरही मजबूत वाढीसह बंद झाले. तर ऑटो आणि आयटी क्षेत्रातील समभाग घसरणीसह बंद झाले.
वाढणारा आणि घसरणारा शेअर –
आजच्या व्यवहारात एसबीआय 3.78 टक्के, जेएसडब्ल्यू 2.12 टक्के, ॲक्सिस बँक 1.77 टक्के, बजाज फायनान्स 1.76 टक्के, नेस्ले 1.68 टक्के, एशियन पेंट्स 1.60 टक्के, सन फार्मा 1.45 टक्के वाढीसह बंद झाले. पॉवर ग्रिड 2.33 टक्क्यांनी, टेक महिंद्रा 2.31 टक्क्यांनी, इन्फोसिस 2.06 टक्क्यांनी, टीसीएस 1.22 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले.




