Stock Market Crash : शेअर बाजारात हाहाकार; ‘या’ कारणामुळे सेन्सेक्स 813 अंकांनी कोसळला
Stock Market Crash : पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या दरातील वाढीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला. सेन्सेक्स 813 अंकांनी घसरला, तर निफ्टी 23,450 खाली बंद झाला.

Stock Market Crash : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. कच्च्या तेलाच्या दराने प्रति बॅरल 100 डॉलरचा टप्पा ओलांडल्याने तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 813 अंकांनी घसरला, तर निफ्टी 23,450 अंकांच्या खाली आला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स 813.35 अंकांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी घसरून 74,764.23 अंकांवर बंद झाला. दिवसभरातील नीचांकी पातळीवरच सेन्सेक्सची समाप्ती झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 203.60 अंकांनी म्हणजेच 0.86 टक्क्यांनी घसरून 23,431.50 अंकांवर स्थिरावला.
गुंतवणूकदारांचे ₹3.46 लाख कोटींचे नुकसान –
एका व्यवहाराच्या दिवसापूर्वी म्हणजेच 08 सप्टेंबर 2026 रोजी BSE वर नोंदणीकृत सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप ₹4,87,64,321.47 कोटी होते. आज म्हणजेच 09 सप्टेंबर 2026 रोजी हे घसरून ₹4,84,17,376.56 कोटींवर आले आहे. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात ₹3,46,944.91 कोटींची घट झाली आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये एचसीएल टेकच्या समभागात सर्वाधिक 4.55 टक्के घसरण झाली. इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभागही घसरले. दुसरीकडे अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, ट्रेंट आणि एनटीपीसीच्या समभागांत वाढ झाली.
पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. ब्रेंट क्रूडचा दर 2.67 टक्क्यांनी वाढून 100.5 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. तेल महागल्याने भारतासारख्या कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
बाजारातील अस्थिरता दर्शविणारा इंडिया व्हीआयएक्स 6 टक्क्यांहून अधिक वाढला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरी वाढल्याचे दिसून आले.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी भारतीय समभागांची 123.19 कोटी रुपयांची विक्री केली. मंगळवारीही सेन्सेक्स 555.23 अंकांनी, तर निफ्टी 144.05 अंकांनी घसरला होता.
कच्च्या तेलाचे दर वाढल्यास शेअर बाजार का घसरतो?
कच्च्या तेलाचे दर वाढले की भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांचा खर्च वाढतो. कंपन्यांना पेट्रोलियम, वाहतूक, वीज, प्लास्टिक, रसायने अशा अनेक क्षेत्रांत जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून कंपन्यांचा नफा कमी होण्याची शक्यता असते. नफा कमी होण्याची भीती निर्माण झाल्यास गुंतवणूकदार त्या कंपन्यांचे शेअर्स विकू लागतात. परिणामी बाजार घसरतो.
परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर्समधून पैसा काढला तरी बाजारावर दबाव येतो. मोठ्या परदेशी संस्था मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी-विक्री करतात. त्यांनी विक्री सुरू केली की बाजारात शेअर्सचा पुरवठा वाढतो आणि त्यांच्या किमती खाली येतात. त्याचबरोबर इतर गुंतवणूकदारांमध्येही घसरणीची भीती निर्माण होऊन विक्री वाढू शकते.





