जयंत पाटील यांचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले,”“राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडणार”

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेले सरकार लवकरच कायद्याच्या मुद्द्यावरून कोसळणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याविषयी महत्वाचे वक्तव्य केले आहे. शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय मंथन शिबीर पार पडणार आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार-खासदार शिर्डीत दाखल झाले आहेत. परंतु, हे शिबीर सुरू होण्याआधीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार असल्याच्या सत्ताधारी पक्षातील काही नेतेमंडळींच्या दाव्याचादेखील यावेळी समाचार घेतला. “आज महाराष्ट्रात सगळ्यात खंबीर पक्ष राष्ट्रवादीच आहे. तो फुटायचा प्रश्नच नाही”, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.दरम्यान, यावेळी जयंत पाटील यांनी सध्या राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेलं सरकार राष्ट्रवादीच्या या अधिवेशनानंतर पडेल, असे सूचक वक्तव्य केले आहे.
“आपल्याच गावाचा असा पायगुण आहे असं स्वत:च जाहीर करणारे आमचे परमस्नेही खासदार यांचं कौतुक वाटतं”, असं म्हणत जयंत पाटलांनी शिर्डीतील विद्यमान खासदारांना टोला लगावला. “शिर्डीला आम्ही सांगणार आहे की तिथे एक अधिवेशन झालं, सरकार पडलं. हे मान्य आहे. पण आता हे अधिवेशन झाल्यावर सरकारच पडणार. पक्ष कसा फुटेल? आज महाराष्ट्रात सगळ्यात खंबीर पक्ष राष्ट्रवादीच आहे. तो फुटायचा प्रश्नच नाही. आता काँग्रेसचं अधिवेशन झाले, तेव्हा माहिती नाही, कुणाचं सरकार होतं. पण ते पडलं. आता आमचं अधिवेशन झालं, तर सध्याचं सरकार पडेल”, असे विधान जयंत पाटील यांनी यावेळी केले.





