ज्येष्ठ पत्रकार भुजंगराव दाभाडे यांचे निधन, भोर तालुक्यात शोककळा

भोर : भोर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक, माजी तालुका अध्यक्ष आणि दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार भुजंगराव (आबासाहेब) दाभाडे यांचे अल्पशा आजाराने सोमवार (दि. 14) रात्री अकरा वाजता निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवार (दि.15) रोजी सकाळी 9 वाजता भोलावडे येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आबासाहेब दाभाडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून भोर तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, क्रीडा, व्यापार आणि उद्योग क्षेत्रांवर परखड आणि सडेतोड लिखाण केले. त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीचा प्रभावी वापर केला. त्यांनी ‘निरावाणी’ साप्ताहिकही सुरू केले होते. त्यांच्या निधनाने भोर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.





