Maharashtra Politics : ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा; सुप्रिया सुळे संतापल्या म्हणाल्या “मला टार्गेट करुन…”
Maharashtra Politics : या सगळ्या घडामोडी घडत असताना काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Vijay Wadettiwar : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. २९ अॅागस्टला ते अंतरवाली सराटीत आंदोलनाला बसणार असून हे आंदोलन निर्णायक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी २८ अॅागस्टची मुदत दिली आहे. हे आंदोलन मुंबईत धडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडेही ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. एवढ्यावर न थांबता त्यांनी थेट अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसीचे प्रमाणपत्र असल्याचे म्हटले आहे. या दाव्यानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
“अर्ध्या मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं आहे. जरांगे पाटलांना माहीत नसेल पण सुप्रिया सुळे यांच्याकडे पण ओबीसी प्रमाणपत्र आहे. सगळ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेऊन ठेवले आहे. मला वाटतं आता ओबीसींनी जनरल व्हावं आणि ओबीसी होऊन जावं, त्यांना द्यायचं त्यांना देऊन टाका. २७ टाक्क्यांमध्ये घुसखोरी वाढली आहे. आरक्षण वाढत नाही मात्र घुसखोरी झाली आहे. त्यामुळे उद्या ओबीसींच्या वाटोळं होईल. सगळ्या नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. सुप्रिया सुळे नाहीतर अनेक! पवार साहेबांकडे आहे की नाही मला माहित नाही. हे प्रमाणपत्र केव्हा घेतले मला माहित नाही पण प्रमाणपत्र आहे.”
दाव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
“काँग्रेसचं काय चाललंय? मला आज राहुलजींना फोन करावाच लागेल. मी जरा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी, दिल्लीतल्या नेत्यांशी बोलते. हे हास्यास्पद आहे. अरे माझ्याकडे सर्टिफिकेट कसं असेल ओ? मला हसू येत आहे. किती खोटे आरोप करायचे एखाद्या माणसावर? त्याची पण एक मर्यादा असते. दुर्देवी आहे की काँग्रेसचे नेते का मला टार्गेट करुन माझ्याबद्दल खोटं परसवत आहेत याच्याबद्दल मी आता काँग्रेस नेतृत्वाशी बोलणार आहे.” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र कसं असेल? असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.





