निकृष्ट रस्त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; औंधमधील दुर्दैवी घटना

पुणे: औंध परिसरातील भाले चौकात निकृष्ट रस्त्यामुळे झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. रस्ता आणि पेविंग ब्लॉकमधील खड्ड्यामुळे गाडी घसरल्याने हा अपघात घडला, ज्यामध्ये एका चारचाकी वाहनाखाली येऊन ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून, पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना 30 जुलै 2025 रोजी घडली. जगन्नाथ काशिनाथ काळे (वय 61) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या घटनेनंतर औंध परिसरातील नागरिकांनी एकत्र येत पुणे महानगरपालिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला. पथ विभागातील अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार न पाडल्याने औंधमधील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. “रस्त्यांची दुरुस्ती वेळीच झाली असती तर ही दुर्घटना टळली असती,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली. तसेच, जबाबदारी न निभावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली.
अपघातानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि दुसऱ्या दिवशी, 31 जुलै रोजी सकाळीच रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. मात्र, नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येते का?” रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या दुर्दैवी घटनेने औंध परिसरातील रस्त्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी, नागरिकांनी रस्त्यांच्या नियमित देखभालीसाठी आणि जबाबदारीच्या अभावी होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. प्रशासन आता या मागण्यांना कशा पद्धतीने प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





