अकोले : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजीमंत्री मधुकरराव पिचड यांचे शुक्रवारी सांयकाळी ६.३० वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. ते 84 वर्षाचे होते. मागील दीड महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचडांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आज पिचड यांची प्रकृती अधिकच खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या शनिवारी दुपारी ४ वाजता राजूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी राजूर येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथून बीए एलएलबीचे शिक्षण घेतले. विद्यार्थी असतानाच पिचड यांनी राजकारणात प्रवेश केला. 1972 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 72 सालीच ते पंचायत समिती अध्यक्ष झाले. अध्यक्ष म्हणून त्यांनी 1980 पर्यंत काम केले.
पिचड यांनी 1961 साली अकोले येथे अमृतसागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली. तर अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. 1993 साली स्थापन झालेला हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना होता. पिचड यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली नंतर ते शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा त्यांचा प्रवास होता. 1980 ते 2014 असे 34 वर्ष त्यांनी अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.1995 ते 1999 या काळात ते विधानसभेत विरोधीपक्ष नेते होते. मधुकर पिचड यांनी मुलगा वैभव पिचड याच्यासह 2019 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात मधुकर पिचड यांचे नाव आदराने घेतले जाते.
अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून त्यांनी 1972 साली राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1972 ते 1980 या काळात ते पंचायत समितीवर सभापती म्हणून कार्यरत होते. 1980 पासून 2009 पर्यंत सलग 7 वेळा ते आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले. पिचड यांनी सलग 34 वर्ष अकोले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. 1991 साली सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. त्यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय होते. त्यानंतर पिचड यांनी शरद पवार, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. पिचड यांनी कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली. त्यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदही भुषवले होते.
2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिचड यांनी आपल्या मुलासह प्रवेश केला होता. पण, त्या निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला. त्यानंतर पिचड यांनी अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे घरवापसीची चर्चा रंगली होती. पण, त्यानंतर मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज संध्याकाळी त्यांनी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला.