सेमीकंडक्टरचा तुटवडा आणखी वाढणार, रशिया आणि युक्रेनकडे 70 टक्के कच्चा माल
मुंबई – मागणी वाढल्याने आणि पुरवठा कमी झाल्यामुळे लॉकडाऊन नंतर जगाला सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहेत. आता रशिया- युक्रेन युद्धामुळे हा प्रश्न आणखी बिकट होणार आहे. सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॅलाडियमचा 44% पुरवठा रशिया करतो. तर सेमीकंडक्टर चिप तयार करताना वापरल्या जाणाऱ्या न्यूॅऑन वायूचा 70 टक्के पुरवठा युक्रेन मधून होतो.
या दोन्ही देशाकडून या वस्तूचा पुरवठा आगामी काळात होणार नसल्यामुळे सेमीकंडक्टरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊ शकतो. मुडीज या पतमानांकन संस्थेने यासंदर्भात माहिती दिली असून जर युद्ध लांबले तर वाहन, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचे उत्पादन ठप्प होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे.
2014 रशिया व युक्रेन दरम्यान युद्ध झाले होते. त्यावेळी ही जागतिक निऑन पुरवठ्यावर परिणाम झाला होता. पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी सेमीकंडक्टर निर्मात्या कंपन्यांनी 2015 पासून या कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणात साठा केला होता. मात्र दोन वर्षाच्या लॉक डाऊनमध्ये हा साठा वापरला गेला आहे.
त्यामुळे पुन्हा या वायूची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवळ या वस्तूचे उत्पादन थांबलेले नाही तर जागतिक वाहतुकीवरही मोठा परिणाम होत आह.े एक तर विमा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर वाढत्या इंधनाच्या खर्चामुळे वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे हे युद्ध शक्य तितक्या लवकर संपुष्टात येण्याची गरज निर्माण झाली आहे.





