नफ्यासाठी गुंतवणूकदारांकडून बँकांच्या शेअरची विक्री

मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्चांकी पातळीवर आहेत. त्याचबरोबर जागतिक परिस्थिती अस्थिर आहे. अशा परिस्थितीत बर्याच गुंतवणूकदारांनी बँका, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून मंगळवारी नफा काढून घेतला. अशा परिस्थितीत शेअर बाजाराचे निर्देशांक पाऊण टक्क्यांनी कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 624 अंकांनी कमी होऊन 81,551 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.70 टक्क्यांनी म्हणजे 174 अंकांनी कोसळून 24,826 अंकावर बंद झाला.
कोणत्या कंपन्या पिछाडीवर
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या शेअरचा भाव 2.21 टक्क्यांनी कोसळला. आयटीसी कंपनीच्या शेअरचा भाव दोन टक्क्यांनी कोसळला. टाटा मोटर्स, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक, महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. इंडसइंड बँक, सन फार्मा, अदानी पोर्ट्स, नेस्ले, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक बर्याच प्रमाणात वाढले होते. त्यातच मंगळवारी जागतिक शेअर बाजारातून संमिश्र संकेत आल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी नफा काढून घेणे पसंत केले.
परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी
दरम्यान निर्देशांक काही प्रमाणात घट होत असूनही परदेशातील गुंतवणूकदार मात्र भारतात खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. सोमवारी या गुंतवणूकदारांनी 135 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. डॉलर इंडेक्स सध्या कमी होऊन 99 अंकावर आला आहे. अशा परिस्थितीत या गुंतवणूकदारांना भारतात खरेदी करणे परवडते. त्याचबरोबर दीर्घ पल्ल्यात भारताचा विकासदरी इतर देशापेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्यामुळे हे गुंतवणूकदार नकारात्मक परिस्थितीतही भारतात खरेदी करीत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
महत्त्वाची आकडेवारी जाहीर होणार
बुधवारी औद्योगिक उत्पादनाची त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या उत्पादकतेची आकडेवारी जाहीर होणार आहे. पायाभूत सुविधांच्या उत्पादकतेची नकारात्मक आकडेवारी अगोदरच जाहीर झालेली आहे. अशा अवस्थेत औद्योगिक उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर एक – दोन दिवसात पहिल्या तिमाहीच्या राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत.





