Pune : स्व. आमदार मुक्ता टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त कर्करोग तपासणी

पुणे : स्वर्गीय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून सर्वोपचार रुग्णालय, अमनोरा येस फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज आणि मुक्ता टिळक मेमोरियल फाउंडेशन यांच्या विद्यमाने कसबा भागातील “स्वच्छ’ संस्थेच्या महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिर आयोजित केले होते.
दि. २२ डिसेंबर रोजी आयोजित शिबिरामध्ये स्वच्छच्या कचरावेचक १५० महिलांनी सहभाग नोंदवला. ज्यांना निदान झाले, त्यांना ससून रुग्णालयात शासनमान्य योजनांतर्गत उपचार केले जाणार आहेत. या शिबिरात डॉ. लता भोईर, अमनोरा येस फाउंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, उपाध्यक्ष विवेक कुलकर्णी उपस्थित होते.
स्वर्गीय आमदार मुक्ताताईंच्या स्मरणार्थ मुक्ता टिळक मेमोरियल फाउंडेशन संस्थेची स्थापना करण्यात आली. मुक्ता टिळक या महापौर असताना शहरातील वंचित घटकातील नऊ हजार महिलांच्या कर्करोग तपासणीसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ४५ लाख रुपयांची तरतूद केली होती. तसेच महापालिकेच्या शाळेतील मुलींची शारीरिक तपासणी करण्याचा उपक्रमही राबविला गेला.
गेल्या दीड वर्षांत संस्थेने आर्थिक दुर्बल असलेल्या एक हजारपेक्षा जास्त महिला आणि पुरुषांसाठी स्क्रिनिंग व तपासणी शिबिर मोफत आयोजित केली होती. यात ब्रेस्ट, सर्व्हायकल, लंग्ज व थ्रोट कॅन्सर या तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली. मागील वर्षात १७ कर्करोग रुग्णांना संस्थेद्वारे मोफत शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपी उपलब्ध करून देण्यात आली आहे.




