पुणे | इडीकडून जप्तीची कारवाई राजकीय द्वेषातून

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामती अॅग्रो लि. या रोहित पवार संचालक असलेल्या कंपनीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील सहकारी साखर कारखान्यावर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत जप्तीची नोटीस आमच्यापर्यंत पोहोचली नाही. केवळ आमचा आवाज दाबण्यासाठी राजकीय द्वेषातून ही कारवाई करण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. रोहित पवार म्हणाले, कन्नड येथील कारखान्यावर ईडीने प्रतीकात्मक जप्तीची कारवाई केली आहे. अजूनपर्यंत जप्तीची नोटीस आमच्यापर्यंत पोहोचली नाही; पण ईडीच्या ट्विटर अकाउंटवर प्रेस नोट पाहिल्यावर आम्हाला ही माहिती कळाली. जप्ती म्हणजे पूर्णपणे जप्ती नसते, ती प्रतीकात्मक असते. १८० दिवस दिले जातात. त्यामध्ये बरीच मोठी प्रक्रिया असते.
कोणत्याही एफआयआरमध्ये माझे आणि बारामती ॲग्रोचे नाव नाही. दोन वर्षे ईडीने कारवाई केली नाही. १९ जानेवारीला मला नोटीस आली आणि २० जानेवारीला क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यात क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ राजकीय द्वेषातून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दि. ८ मार्च रोजी बारामती ॲग्रोला प्रेस नोटद्वारे नोटीस आली. ही प्रेस नोट चुकीची आहे. अशीच प्रेस नोट जरंडेश्वरच्या प्रकरणातही आली होती. ही प्रेस नोट कॉपी पेस्ट केलेली आहे. त्यामुळे याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असेही रोहित पवार यांनी सांगितले.




