तलावात मुलगा बुडताना पाहून बापाने मारली उडी पण प्रयत्न ठरले अपयशी; जालन्यात पिता-पुत्राचा बुडून मृत्यू
Updated On:

जालना : जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा बुडून मृत्य झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल दुपारी घडली. तब्बल तासाभराच्या शोधकार्यानंतर बुडालेल्या पिता-पुत्राचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
माणिक निर्वळ व त्यांचा १४ वर्षांचा मुलगा आकाश हे आपल्या इतर तीन नातेवाईकांसोबत मोती तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना आकाश बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी माणिक निर्वळ यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पिता-पुत्र बुडाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांसह अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या शोधकार्यानंतर पिता-पुत्रांचे मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.





