अयोध्येत सुरक्षा व्यवस्था कडक; एआय, सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून लक्ष

Ramlala Pran Pratishtha: अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून रामनगरीचे रूपांतर अभेद्य किल्ल्यामध्ये करण्यात आले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी अयोध्येत राहणाऱ्या लोकांनाही शहरात प्रवेश घेताना त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. एवढेच नाही तर मंदिराच्या सुरक्षेसाठी तीन स्तरावरील सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
22 जानेवारीला हजारो लोक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे, यामध्ये अनेक व्हीआयपी पाहुणे देखील उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय एजन्सी सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सतर्क आहेत. यासोबतच स्थानिकांना ओळखपत्रेही देण्यात आली आहेत.
शनिवारपासून (20 जानेवारी) अयोध्येची सीमा बंद करण्यात आली असून बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने शुक्रवारी (19 जानेवारी) रात्रीपासून वाहतूक वळवण्यात आली आहे. अमेठी, सुलतानपूर, गोंडा, लखनौ, बस्ती येथून अयोध्येच्या दिशेने येणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्यात येत आहेत.
सीसीटीव्ही आणि एआयच्या माध्यमातून पाळत –
मंदिराच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि पीएसी तैनात करण्यात आले आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर यूपी पोलिसांनी अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. याशिवाय एआय, सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून शहरावर नजर ठेवली जाणार आहे.
22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राण प्रतिष्ठाला प्रमुख यजमान म्हणून उपस्थित राहतील आणि राम मंदिराचे उद्घाटन करतील. पंतप्रधानांच्या सुरक्षेत गुंतलेला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) देखील सुरक्षा व्यवस्थेत सामील असेल. उत्तर प्रदेश पोलिस आणि पीएसीचे 1400 कर्मचारी मंदिराच्या बाहेर असलेल्या रेड झोनमध्ये तैनात असतील.





