पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाने आज दोन पत्रकार छायाचित्रकारांना बेदम मारहाण केली. पाटण्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. या महाविद्यालयामध्ये सातव्या टप्प्यातील मतदान केंद्र उभारण्यात आले होते. पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघासाठी तेजप्रताप यादव या ठिकाणी मतदान करण्यासाठी आले असता, किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर पत्रकार छायाचित्रकारांना मारहाणीमध्ये झाले.
मतदान झाल्यावर तेजप्रताप यादव यांच्या कारला अनेक लोकांनी घेराव घातला होता. त्या गडबडीमध्ये कारचे चाक एका पत्रकाराच्या पायावरून गेले. यामुळे कार थांबली आणि सुरक्षा रक्षकाने पत्रकारांना मारहाण केली. हे पत्रकार कारच्या बॉनेटवर चढून खिडक्यांवर थपडा मारत होते, असा आरोप तेजप्रताप यादव यांनी केला.
पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा काही पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकाराबाबत राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी माफी मागावी, अशी मागणी या संघटनांनी केली. भाजपचे उमेदवार रविशंकर प्रसाद यांनीही हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.