Pakistan : सुरक्षा परिषदेतील चर्चा पाकिस्तानला पडली महागात

Pakistan – भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थिती संदर्भात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये काल चर्चा झाली. सुरक्षा परिषदेतल्या सदस्य देशांनी चर्चा करण्याचे आणि तणाव कमी करण्याचे आवाहन दोन्ही देशांना केले. मे महिन्यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद ग्रीसकडे आहे. तर पाकिस्तान सध्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे.
पहलगाम हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून भारताकडून विविध निर्बंध घातल्यानंतर तणावाच्या मुद्द्यावर सुरक्षा परिषदेत बंद कक्षात चर्चा करण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तानच्यावतीने ग्रीसकडे करण्यात आली होती. ही चर्चा जवळपास दिड तास चालली. सुरक्षा परिषदेची बैठक ज्या बैठक कक्षामध्ये होते, तेथे या मुद्द्यावरील चर्चा झाली नाही.
तर या बैठक कक्षाला लागून असलेल्या चर्चा कक्षामध्ये ही बैठक झाली. मात्र बैठकीला उपस्थित असलेल्या १५ सदस्यांपैकी कोणीही या बैठकीसंदर्भात कोणतेही निवेदन प्रसिद्धीस दिले नाही. पण चर्चेसाठीचा आपला हेतू साध्य झाल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानच्यावतीने देण्यात आली.
संयुक्त राष्ट्रातील राजकीय शांतता निर्मिती आणि शांतता ऑपरेशन्स या दोन्ही विभागांसाठी मध्यपूर्व, आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठीचे सहायक सरचिटणीस मोहम्मद खिआरी यांनी सुरक्षा परिषदेला तणावाची माहिती दिली.
भारताने सिंधू पाणी वाटप करार निलंबित केल्याचा मुद्दा पाकिस्तानच्यावतीने चर्चेदरम्यान उपस्थित केला गेला. शांततामय मार्गाने सर्व शेजाऱ्यांशी सहकार्याचे संबंध कायम ठेवण्यास पाकिस्तान कटिबद्ध आहे. पाणी हे शस्त्र नाही. या नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानमधील २४० दशलक्ष लोक राहत असल्याचे पाकिस्तानचे कायम सदस्य इफ्तिकार अहमद यांनी सांगितले.
पाकिस्तानला संघर्ष नको आहे. मात्र आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास पाकिस्तान सज्ज असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान चर्चेसाठी नेहमीच तयार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांकरवी मध्यस्थी केली जाण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मात्र आज पुन्हा पुर्वीप्रमाणे पाकिस्तानचा भ्रमनिरास झाला. अपेक्षेनुसार सुरक्षा परिषदेतील सदस्यांनी पाकिस्तानच्या दाव्याला कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. सुरक्षा परिषदेने हस्तक्षेप करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना भारतीय प्रतिनिधींनी पुन्हा एकदा अपयशी ठरवले, असे सुरक्षा परिषदेतील माजी सदस्य असलेल्या भारताचे कायम प्रतिनिधी सयेद अकबरुद्दीन यांनी सांगितले.
गुटेरेस यांच्याकडून दहशवादी हल्ल्याचा निषेध
चर्चेपुर्वी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेरेस यांनी भारत-पाकिस्तानमधील तणावाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचाही तीव्र शब्दात निषेध केला. समान्य नागरिकांना लक्ष्य केले जाणे अमान्य आहे.
या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अशा प्रसंगी लष्करी संघर्ष टाळला जाणे महत्वाचे आहे. असा संघर्ष सहजपणे नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.





