‘काँग्रेसचेच काही नेते भाजपशी मिळालेले आहेत’, स्वतःच्याच पक्षातील नेत्यांवर राहुल गांधींनी साधला निशाणा, म्हणाले…

Rahul Gandhi | काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरात दौऱ्यावर असताना राहुल गांधींनी पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पक्षातील नेत्यांवरच निशाणा साधत गुजरातमधील काही काँग्रेस नेते भाजपची मदत करत असल्याचे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याआधी लोकसभा निवडणुकीतही पक्षाला यश मिळाले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत राहुल गांधींनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी करण्याचे आवाहन केले.
राहुल गांधींनी अहमदाबाद येथे वर्कर्सलॉग डायरेक्टर कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गुजरातमधील काँग्रेसचेच काही नेते भाजपमध्ये सहभागी झालेले आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसची दोन प्रकारची लोकं आहेत. एक असे जे जनतेसोबत आहेत, त्यांच्यासाठी लढत आहेत व त्यांचा मनात काँग्रेसची विचारधारा आहे. तर दुसरे असे आहेत जे जनतेपासून लांब आहेत, जनतेची इज्जत करत नाही व यातील अर्धे भाजपशी मिळाले आहेत.
ते पुढे बोलताना म्हणाले की, जोपर्यंत आपण या दोन प्रकारच्या लोकांना आपण वेगळे करत नाही तोपर्यंत गुजरातचे लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. गुजरातमधील व्यावसायिकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना पर्याय हवा आहे, त्यांना बी टीम नको आहे. या दोन्ही गटांना वेगळे करण्याची जबाबदारी माझी आहे.
जनतेशी नाते निर्माण करायचे असतेस, तर आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील. एक म्हणजे या दोन्ही गटांना वेगळे करणे. कठोर कारवाई करायची असेल तर करू. 10, 20, 30 लोकांना काढून टाकायचे असेल, तर काढून टाकू., असेही यावेळी बोलताना राहुल गांधींनी पक्षातील नेत्यांना इशारा दिला.
दरम्यान, येत्या 8 आणि 9 एप्रिलला काँग्रेसचे अधिवेशन देखील गुजरातमध्ये पार पडणार आहे. तब्बल 64 वर्षांनी राज्यात पक्षाचे अधिवेशन भरणार आहे. काँग्रेसचे गुजरातमधील शेवटचे अधिवेशन 1961 मध्ये पार पडले होते.





