नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात 144 कलम लागू

माळशेज – नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाट हा पावसाळ्यात पर्यटनासाठी राज्यभर प्रसिध्द आहे. गत काळात घाटात अनेकदा अप्रिय घटना घडून जीवितहानी झाल्याने व येथील शांतता, कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून 30 ऑगस्टपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती टोकावडे पोलिसांनी दिली.
दरवर्षी पावसाळ्यात घाटातील धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद व निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठविण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे माळशेज घाटात येत असतात. त्यामुळे कलम 144 लागू करण्यात आले असून, माळशेज घाटात टोकावडेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक भदे, पोलीस जवान संदीप औटी, पोलीस हवालदार कडव यांच्यासह सुमारे 20 पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.





