प्रभात वृत्तसेवा पानशेत – खानापूर-डोणजे गटातील आगामी निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली असून, गट पातळीवर अत्यंत ’गुप्त’ राजकीय समीकरणे जुळत असल्याची चर्चा आहे. या ’गुपचूप’ हालचालींमुळे वर्षानुवर्षे चालत आलेले राजकीय अंदाज सपशेल चुकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.सध्या इच्छुकांच्या नावांची गर्दी असली तरी, विद्यमान आमदार भीमराव (अण्णा) तापकीर यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी (पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) या प्रमुख पक्षांचे लक्ष एका ’अज्ञात’ किंवा ’अति-महत्वाकांक्षी’ उमेदवाराकडे लागून राहिले आहे. या उमेदवाराने अद्याप पूर्णपणे नाव जाहीर केलेले नसले तरी त्याने पायाला भिंगरी बांधली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर ’एक अनुभवी’, ’युवा तडफदार’ किंवा ’सत्ताधार्यांचा पूर्वीचा समर्थक’ उमेदवार मैदानात टिकला, तर तो शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढवेल. हा तगडा उमेदवार खानापूर-खेड-शिवापूर गटातील किमान 30 ते 40 टक्के पारंपारिक मतपेढी तोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही जागा जिंकण्यासाठी विरोधी पक्षांनी जी ’गुपचूप’ रणनीती आखली होती, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या अचानक झालेल्या एंट्रीमुळे मोठा ’धक्का’ बसू शकतो. या अनपेक्षित एन्ट्रीमुळे प्रमुख पक्षांना आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची संपूर्ण रणनीती बदलावी लागत आहे, अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे. या गटातील राजकारणावर अनेक वर्षांपासून लक्ष ठेवून असलेल्या राजकीय विश्लेषकांच्या मते, ही निवडणूक गटातील प्रस्थापित नेतृत्वासाठी ’अस्तित्वाची लढाई’ ठरणार आहे. या गटाचा निकाल म्हणजे केवळ उमेदवाराचा विजय नाही, तर ज्या राजकीय नेत्यांचे गटावर वर्चस्व आहे, त्यांच्या भविष्यातील वाटचालीवर प्रश्नचिन्ह उभे करणारा असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. हा तगडा उमेदवार नेमका कोणाच्या ’शक्ती’वर मैदानात उतरला आहे? तो केवळ मतविभागणी करणार की थेट ’निकाल’ बदलणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मतमोजणीच्या दिवशीच मिळतील. मात्र, तोपर्यंत खानापूर-डोणजे गटातील प्रत्येक मतदाराला ’हा’ राजकीय सस्पेन्स अनुभवायला मिळणार आहे, यात शंका नाही! खेड शिवापूर विरुद्ध खानापूर-डोणजे पट्टा.. गटाचा इतिहास पाहता माजी जि. प. सदस्य नवनाथ पारगे (राष्ट्रवादी – शरद पवार गट) यांचा विशेष प्रभाव डोणजे-खानापूर पट्ट्यात आहे. ज्यामुळे गटातील दोन प्रमुख भागांच्या मतविभागणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या विभागांमध्ये होणारी मतविभागणी निर्णायक ठरू शकते.