पुणे | द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आजपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ जुलैपर्यंत आहे.
अभियांत्रिकी पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरू झाले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने पदविका झालेले विद्यार्थी थेट अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेशासाठी अर्ज करतात. ही सर्व प्रक्रिया आॅनलाइनद्वारे केंद्रीय पद्धतीने होणार आहे.
राज्य सीईटी सेलद्वारे या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दि. १५ ते २५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करताना सर्व कागदपत्रे राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. अर्जस्वीकृती १६ जुलै २६ जुलै या कालावधीत होणार आहे.
त्यानंतर २९ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केले जाईल. या यादीवर काही आक्षेप अथवा हरकती ३० जुलै ते १ आॅगस्ट या दरम्यान नोंदविता येतील. त्यानंतर ३ आॅगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सीईटी सेलकडून करण्यात आली.




