‘सेबी’ने बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आणि त्याच्या पत्नीसह ५९ जणांवर घातली बंदी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

मुंबई: भारतीय विनिमय मंडळाने (सेबी) गुरुवारी बॉलिवूड अभिनेता अरशद वारसी, त्यांची पत्नी मारिया गोरेटी आणि इतर ५७ जणांवर यूट्यूब चॅनेलवरील दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंद्वारे ‘साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड’च्या शेअरच्या किमतीत हेराफेरी केल्याप्रकरणी १ ते5 वर्षांसाठी शेअर बाजारातून बंदी घातली आहे.
या प्रकरणात सेबीने अरशद वारसी आणि मारिया गोरेटी यांच्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर साधना ब्रॉडकास्ट (आता क्रिस्टल बिझनेस सिस्टम लिमिटेड) च्या प्रवर्तकांसह इतर ५७ घटकांवर ५ लाख ते ५ कोटी रुपयांपर्यंत दंड आकारला आहे.
सेबीने या ५९ घटकांना ५८.०१ कोटी रुपयांच्या अवैध नफ्यासह १२ टक्के वार्षिक व्याजासह परतावा करण्याचे आदेश दिले आहेत. सेबीच्या तपासात अरशद वारसी यांनी ४१.७० लाख रुपये आणि मारिया गोरेटी यांनी ५०.३५ लाख रुपये नफा कमावल्याचे आढळले.
सेबीच्या अंतिम आदेशानुसार, गौरव गुप्ता, राकेश कुमार गुप्ता आणि मनीष मिश्रा हे या हेराफेरीमागील मुख्य सूत्रधार होते. साधना ब्रॉडकास्टच्या RTA चे संचालक सुभाष अग्रवाल यांनी मनीष मिश्रा आणि प्रवर्तकांमधील मध्यस्थाची भूमिका बजावली. पीयूष अग्रवाल आणि लोकेश शाह यांनी आपल्या नियंत्रित खात्यांचा वापर मनीष मिश्रा आणि प्रवर्तकांच्या योजनांसाठी केला.
काय आहे प्रकरण?
सेबीने अरशद वारसी, मारिया गोरेटी आणि त्यांच्या भावाला एका वर्षासाठी शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. त्यांच्यावर ‘साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड’च्या शेअरच्या किमती कृत्रिमरित्या वाढवून नंतर जास्त किमतीत विक्री करून नफा कमावल्याचा आरोप आहे. यासाठी ‘द अॅडव्हायझर’ आणि ‘मनीवाइज’ या यूट्यूब चॅनेलवर दिशाभूल करणारे व्हिडिओ अपलोड करण्यात आले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना फसवण्यात आले.




