Stock Market : SEBIचा अवधूत साठे ट्रेडिंग अकादमीला मोठा दणका; 546 कोटी रुपये परत करण्याचे आदेश
Stock Market : 67.87 कोटी रुपये IPEFमध्ये जमा करण्याचे निर्देश; 11.50 कोटींचा दंड, बाजारातील व्यवहारांवरही निर्बंध

Stock Market : भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (SEBI) अवधूत साठे ट्रेडिंग अकादमी (ASTPL) आणि तिचे संस्थापक अवधूत साठे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. अकादमी आणि साठे यांनी गुंतवणूकदार व सहभागींकडून घेतलेले 546.17 कोटी रुपये परत करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्ला आणि रिसर्च अॅनालिस्ट सेवा दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
67.87 कोटी रुपये IPEFमध्ये जमा करावे लागणार –
सेबीने अवधूत साठे आणि अकादमीला 67.87 कोटी रुपये इन्व्हेस्टर प्रोटेक्शन अँड एज्युकेशन फंडमध्ये (IPEF) जमा करण्याचेही निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील अंतिम आदेश 23 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला. परताव्याच्या आदेशाचे पालन होईपर्यंत किंवा दोन वर्षांपर्यंत, यापैकी जो कालावधी नंतर संपेल तोपर्यंत साठे आणि अकादमीला सिक्युरिटीज मार्केटमधील व्यवहार करता येणार नाहीत.
गौरी साठेंवरही सहा महिन्यांची बंदी –
अकादमीच्या संचालक गौरी अवधूत साठे यांच्यावर सहा महिन्यांसाठी बाजारातील व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अकादमी, अवधूत साठे आणि गौरी साठे यांच्यावर एकूण 11.50 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये अकादमीला 6 कोटी, अवधूत साठे यांना 4 कोटी आणि गौरी साठे यांना 1.50 कोटी रुपयांचा दंड आहे. आदेश मिळाल्यापासून 45 दिवसांत हा दंड भरावा लागणार आहे.
बँक खाती आणि मालमत्तांवर निर्बंध –
सेबीने अकादमी आणि अवधूत साठे यांची बँक खाती गोठवण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित रक्कम जमा केल्यानंतरच हे निर्बंध हटवले जातील. तसेच त्यांना आपली मालमत्ता विकण्यासही मनाई करण्यात आली आहे. मात्र, परताव्याचा आदेश पूर्ण करण्यासाठी शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक विकण्यास परवानगी असेल. नोंदणीशिवाय देण्यात येणाऱ्या गुंतवणूक सल्ला आणि रिसर्च अॅनालिस्ट सेवा तातडीने बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
2017 ते 2025 या कालावधीतील व्यवहारांची तपासणी –
सेबीने 1 जुलै 2017 ते 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीतील अकादमी आणि अवधूत साठे यांच्या कामकाजाची तपासणी केली. अकादमीने केवळ शेअर बाजाराचे शिक्षण देण्यापुरते काम न करता विशिष्ट शेअर्सबाबत सल्ला देण्यास सुरुवात केल्याचे सेबीचे म्हणणे आहे. यात ट्रेडिंग कॉल, शेअर्सची खरेदी-विक्रीची लक्ष्ये, स्टॉप-लॉस आणि किमतीच्या दिशेबाबत अंदाज यांचा समावेश होता. हे काम आवश्यक नोंदणीशिवाय करण्यात आल्याचा आरोप आहे. ऑगस्ट 2025 मध्ये सेबीने करजत येथील अकादमीवर छापाही टाकला होता.
नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्ला देता येत नाही –
सेबीच्या नियमानुसार, आवश्यक नोंदणीशिवाय कोणालाही गुंतवणूकदारांना शेअर्सबाबत सल्ला देता येत नाही. सेबीकडून अशा अनधिकृत सल्लागारांपासून सावध राहण्याचे आवाहन वेळोवेळी केले जाते. कमी वेळेत मोठा नफा मिळवण्याच्या अपेक्षेने अनेक गुंतवणूकदार अशा सल्ल्याच्या आहारी जातात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सल्ला देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेची सेबीकडे नोंदणी आहे की नाही, याची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे.





