Sébastien Lecornu : फ्रान्सच्या अध्यक्षपदी लेकोर्नू यांची फेरनियुक्ती

पॅरिस : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी लेकोर्नू यांची पंतप्रधान म्हणून फेरनियुक्ती केली आहे. अलिकडेच राजकीय एकमत साध्य होऊ न शकल्यामुळे लेकोर्नू यांनी सरकार स्थापन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पंतप्रधानपदासाठी कोणीही योग्य व्यक्ती न मिळाल्यामुळेच आपली नियुक्ती झाली होती. देशात राजकीय मतभेद अधिक तीव्र झाल्यामुळे आपण या पदावर दीर्घकाळ राहू शकणार नाही, याची आपल्याला कल्पना असल्याचे लेकोर्नू यांनी शनिवारी कबूल केले.
लेकोर्नू यांनी गेल्या तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून फ्रान्समध्ये राजकीय अस्थिरता आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर अध्यक्ष मॅक्रॉ यांनी लेकोर्नू यांची फेरनियुक्ती केली आहे. लेकोर्नू यांनी परिस्थिती आता संयमाने हाताळण्याचे ठरवले आहे. त्यांनी देशवासियांना संयमाचे आणि राजकीय पक्षांना सहकार्याचे आवाहन केले आहे. देशाचा अर्थसंकल्प निश्चित कालमर्यादेमध्ये संसदेत मंजूर करून घेणे गरजेचे आहे. हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी राजकीय पक्षांनी सरकारला सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या अध्यक्षपदाची दुसरी टर्म २०२७ पर्यंत असणार आहे. त्यांच्या मध्यममार्गी गटाला संसदेमध्ये बहुमत नाही. तसेच सरकारमधील पदांवरील नियुक्त्यांवरूनही मोठी टीका होते आहे. लेकोर्नू यांच्या फेरनियुक्तीमुळे डाव्या आणि कडव्या उजव्या विचारांच्या राजकीय पक्षांनी मॅक्रॉ यांच्यावर मोठी टीका करायला सुरुवात केली आहे. लेकोर्नू हे फ्रान्समध्ये नियुक्त झालेले वर्षभरातील चौथे पंतप्रधान आहेत. राजकीय अस्थिरतेबरोबर ढासळत चाललेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याचा ताण देशावर वाढत चालला आहे.





