पिंपरी | महाविकास, महायुती कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळी ठिकाणे

पिंपरी, (प्रतिनिधी) – बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करण्यात आली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये वाद नको, यासाठी महाविकास आघाडी व महायुती कार्यकर्त्यांसाठी बालेवाडी येथे वेगवेगळी ठिकाणे ठरवून दिली होती. दोन वेगवेगळ्या गेटजवळ तसे सूचना फलक लावण्यात आले होते.
मावळ लोकसभेत महाविकास आघाडी व महायुती यांची थेट लढत असल्याने यंदाची लोकसभा निवडणुक अटीतटीची होणार या अनुषंगाने निवडणूक विभागाने योग्य त्या उपायोजना केल्या होत्या. मतमोजणी ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतमोजणीच्या ठिकाणी एकत्र येतात. अनेकदा यावेळी वादाचे प्रसंग निर्माण होतात.
या पाश्र्वभूमीवर निवडणूक विभागाने महाविकास आघाडी व महायुती यांच्या कार्यकर्त्यांसाठी मतदान मतमोजणी केंद्राच्या बाहेर थांबण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे ठरवून दिली होती. महायुतीसाठी मुंबई-बंगलूर महामार्गावरील मेट्रो पुलाजवळील गेट जवळ करण्यात आली होती.
तर महाविकास आघाडीसाठी बालेवाडीगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आॅर्चिड हॉटेलच्या मागील गेटजवळ करण्यात आली होती. सकाळी दहानंतर दोन्ही ठिकाणी कार्यकर्ते गोळा होण्यास सरुवात झाली. मात्र, महायुतीचे व महाविकास आघाडी कार्यकर्ते पाहिजे, त्या प्रमाणात आले नव्हते. मात्र, महायुतीचा उमेदवार विजयाच्या जवळ जाताना दिसताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.
कार्यकर्ते उन्हात ताचकळत
मतदान मतमोजणी केंद्राजवळील दुकाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांचे मोठे हाल झाले. तर केंद्राजवळ ध्वनीपक्षेपकावर निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्ते उन्हात ताटकळत उभे राहत असल्याचे दिसून आले.





