मुंबईत प्रत्येक प्रवाशाला ‘ही’ अत्यंत महत्वाची गोष्ट बंधनकारक, 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

मुंबई- मुंबई पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला असून शहरात आता वाहन चालकासह गाडीत बसलेल्या प्रत्येक प्रवाशाला सीटबेल्ट ( Seat Belt ) लावणे अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयाची येत्या 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मुंबईतील वाढत्या रस्ते अपघताच्या घटना पाहता मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत आता दुचाकीवरील सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीपाठोपाठ चार चाकी वाहनातील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट ( Seat Belt ) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयानंतर ज्यांच्या गाडीत सीटबेल्टची सोय नाही त्यांनी ती तातडीन करून घेण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.
याबाबत पोलिसांनी एक अधिकृत प्रेस नोट जारी केली आहे. सीट बेल्टची ( Seat Belt ) सुविधा नसलेल्या वाहनांमध्ये 1 नोव्हेंबरपर्यंत सीट बेल्ट सुविधा बसवणे अनिवार्य आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे सीटबेल्ट न घातलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
पोलिसांनी जारी केलेल्या नोटमध्ये म्हटले की, मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम, 2019 नुसार, कलम 194(बी) (1) अन्वये जो कोणी सीटबेल्ट न लावता मोटार वाहन चालवत असेल किंवा सीट बेल्ट न लावलेल्या प्रवाशांना घेऊन जात असले तर तो दंडनीय अपराध असल्याचे स्पष्ट केले.





