Seasonal Fruit : १०० रुपयांपासून सुरू, पण ग्राहक वेडे! नक्की काय खास आहे या फळात?

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी चिंचवड – हंगामी ग्रामीण मेवा म्हणून ओळखले जाणारे गावरान सीताफळ पिंपरी चिंचवडच्या बाजारपेठेत दाखल होताच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. बाजारात उपलब्ध झालेल्या या सीताफळांनी चवीसह पौष्टिकतेची भुरळ घातली असून, ठिकठिकाणी दुकाने सजली आहेत.सध्या प्रती किलोला १०० ते १५० रुपयांचा दर असून, ग्राहकांकडून उत्स्फूर्त मागणी आहे. यामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्त्व ‘सी’ मुबलक प्रमाणात असल्याने हे फळ पचनास मदत करणारे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे मानले जाते.
बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असल्याने ग्राहक या हंगामी मेव्याची आवर्जून खरेदी करत आहेत. यंदा राज्यातील काही भागात जरी मुसळधार पाऊस झाला असला तरी काही भागांमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात सीताफळाची आवक होत आहे. दिवसेंदिवस सिताफळाच्या मागणी वाढ होत असल्याने प्रतिकिलोचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळेल, अशी अपेक्षा आहे.सीताफळ कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे फळ मानले जाते. हंगामी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या लागवडीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आहे. पौष्टिक, चविष्ट आणि बहुगुणी सीताफळाचा गोडवा सध्या पिंपरी चिंचवडकरांच्या भुरळ घालत आहे.





