Pune District: तमाशा पंढरी गजबजणार

नारायणगाव : महाराष्ट्रात तमाशा पंढरी म्हणून ओळख नारायणगाव येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर विठाई नगरीत लोकनाट्य तमाशा फड मालकांनी राहुट्या उभारण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी गावोगावच्या जत्रा, यात्रा, उरूस यांचा हंगाम सुरू होणार असल्याने तमाशाची सुपारी ठरवण्यासाठी तमाशा फडमालकांकडे यात्रा कमिटीचे पदाधिकारी व गावपुढारी गर्दी करीत असतात.
पुढील तीन महिने नारायणगाव येथील विठाई नगरीत तमाशा राहूट्यांचे अस्तित्व राहणार आहे. तमाशा फडफडकांच्या मागणीनुसार पिण्याचे पाणी स्वच्छता गृह व वीजपुरवठ्याची सुविधा नारायणगाव ग्रामपंचायत करून देणार असल्याचे उपसरपंच योगेश पाटे यांनी नमूद केले. तमाशा फडमालकांना राहुट्या उभारण्यासाठी जागा मालक आतार व शेलोत सलग तीन वर्षापासून विनामूल्य जागा देत आहेत.
शुभारंभ प्रसंगी नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, आरिफ आतार, मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे संचालक विकास तोडकरी, अजित वाजगे, अक्षय वाव्हळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटे, संतोष दांगट, नारायणगाव विकास सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, विजय विटे, अजित कोर्हाळे, यांच्यासह तमाशा फड मालक किरण ढवळपुरीकर, मोहित नारायणगावकर, महाजन जळगावकर, कांताबाई जाधव, राजू बागुल तसेच तमाशा व्यवस्थापक ,कलाकार व गावकरी उपस्थित होते.
म्हणून विठाई नगरी नाव.. योगेश पाटे
तमाशा कलावंतांनी नेहमी सहकार्याची भूमिका ठेवली आहे. तर गेली अनेक वर्षापासूनच्या परंपरेनुसार यात्रा कमिटी, मुक्ताबाई काळूबाई देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, समस्त नारायणगावकरांनी तमाशा कलावंतांना आपल्या घरातील सदस्य असल्यासारखी त्यांची जपणूक करण्याची भूमिका घेतली आहे. विठाबाईंनी नारायणगावचे नाव सातासमुद्रा पलीकडे नेण्याचे काम केले आहे. विठाबाईंना मानवंदना म्हणून तमाशा फड मालकांनी राहूट्या उभारलेल्या नगरीला विठाई नगरी म्हणून नाव दिले, असे उपसरपंच योगेश पाटे यांनी नमूद केले.
तमाशा फड मालकांनी फसवणूक करू नये
नारायणगाव तमाशा पंढरीचे नाव होत असताना काही फड मालक सुपारी घेतात; परंतु तमाशा करत नाही अशा तक्रारी येत आहे. अशा फडमालकांना आपल्या विठाई नगरीत जागा उपलब्ध करून देऊ नका. अशा फड मालकांना वेळीच रोखा. अन्यथा याचा परिणाम भविष्यात तुमच्या व्यवसायावर तर होईलच परंतु नारायणगावच्या नावावरही होईल. यात्रा संपल्यानंतर तमाशा फडमालकांच्या विरोधात गावागावातून फोन येण्यास सुरुवात होते. काही तमाशा फड मालक तमाशा कलावंतांना वेळेवर पैसे देत नाही असे होता कामा नये. कारण कलावंतांवरच तमाशाचे फड चालत असतात.
नारायणगाव (ता. जुन्नर) : शिवजयंतीच्या मुहूर्तावर विठाई नगरीत लोकनाट्य तमाशा फड मालकांनी राहुट्या उभारण्यास सुरुवात केली आहे.





