पिरंगुट, (वार्ताहर) – येथील पुलावर पडलेले खड्डे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष सागर मारणे यांच्या पुढाकारातून बुजविण्यात आले. पिरंगुट येथे पिरंगुट पोलीस मदत केंद्रानजीक हा पूल आहे आहे. अनेक वर्षांपासून या पुलावर मोठमोठे खड्डे पडले होते. वारंवार मागणी करून देखील खड्डे बुजविले जात नव्हते. दोनच महिन्यांपूर्वी या पुलावर डांबरीकरण करण्यात आले होते; परंतु निकृष्ट कामामुळे या ठिकाणी अवघ्या दोनच महिन्यात पुन्हा खड्डे पडले. परिणामी वाहन चालकांना व येणार्या जाणार्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात येताच सागर मारणे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून सिमेंट काँक्रीटच्या माध्यमातून या ठिकाणी पडलेले खड्डे बुजवून घेतले. मुळशी तालुक्यातील रस्त्यांची स्थिती बिकट झाली असून याची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली आहे. नागरिकांनी नादुरुस्त रस्त्यांचे फोटो व्हिडिओ पाठवावे. या रस्त्याचे काम करून घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे सागर मारणे यांनी सांगितले.