मूर्तिकारांना महागाईचा फटका ! मूर्तींच्या किमतीत मोठी वाढ.. गणेशभक्तांच्या खिशाला कात्री

तळेगाव दाभाडे – गणरायाच्या आगमनाची घडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीआहे. तर मूर्ती निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्याने यंदा मूर्तीच्या किमतींमध्ये 20 ते 25 टक्केची वाढ झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होण्यासाठी अद्याप अवकाश असला तरी कारागीर मूर्ती रंगविण्याच्या कामात मग्न असल्याचे पहायला मिळत आहे.
गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पेण व हमरापुर येथून मोठ्या प्रमाणावर कच्या गणेशमूर्ती आणून त्यावर रंगकाम व इतर कला कुसर केली जाते. जुलै महिन्याच्या सुरवातीपासुन गणेशमूर्ती कारखान्यात रंगकामाला सुरुवात होते. मात्र, हवामानातील बदल, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आदींमुळे सर्वच कारखान्यांमध्ये अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आदि राज्यातून मूर्ती निर्मितीसाठी लागणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस, काथ्या, रंग आदी कच्या मालाची आयात केली जाते. या कच्च्या मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने व इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च तिपटीने वाढल्याने मूर्तिकारांना खर्च मोठा पण उत्पन्नात तोटा झाल्याने महागाईचा फटका बसला आहे. मूर्तीच्या रंगकामासाठी लागणाऱ्या रंगाच्या 20 लिटरच्या बादली मागे सुमारे 1000- 1200 रुपयांची दरवाढ झाल्याची माहिती मूर्तिकार सचिन कुंभार यांनी दै. “प्रभात’ शी बोलताना दिली.
विजेच्या लपंडावाने मूर्तिकार त्रस्त
शहरासह ग्रामीण भागात मागील 15 दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. याबाबत त्रस्त ग्राहकांनी तसेच व्यापाऱ्यांनी अनेकदा महावितरणच्या कार्यालयात निवेदन देऊनही वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात कोणतीही सुधारणा झालेली नाही. दिवसा 10 ते 15 वेळा बत्ती ये – जा करत असून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुवठ्यामुळे मुर्तिकार त्रस्त झाले असून कामात सतत विघ्न येत असल्याची कैफीयत गणेशमुर्तीकारांनी दै. “प्रभात’ शी सोबत बोलताना मांडली आहे.





