SCO Conference: “अखेर पाकिस्तानी पंतप्रधानांना भारतापुढे नतमस्तक व्हावे लागले”

इस्लामाबाद – शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी इस्लामाबादमध्ये गेलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानच्या भेटीनंतर आता नवी दिल्लीत परतले आहेत. जयशंकर यांनी त्यांचे चांगले स्वागत केल्याबद्दल पाकिस्तानचे आभार मानले आहेत.
भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये जेवणाच्या टेबलावर अनौपचारिक संभाषण झाल्याचा दावा करत पाकिस्तानी मीडियाने एक व्हिडिओ जारी केला आहे. जवळपास दशकभरातील भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची ही पहिलीच पाकिस्तान भेट होती. या दौऱ्यात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांवर थेट हल्ला करण्याचे टाळले.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार भारताने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान जसे वक्तव्य करतील त्यानुरूप भारताची दिशा राहील. अखेरीस पाकिस्तानी पंतप्रधानांना भारतापुढे नतमस्तक व्हावे लागले. पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी इस्लामाबादमध्ये येण्याआधीच स्पष्ट केले होते की ते आपल्या उद्घाटनाच्या भाषणात कोणतेही टोकदार वक्तव्य करणार नाहीत.
जयशंकर आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्यात डिनर टेबलवर चर्चा झाली. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही शिखर परिषद सुरू होण्यापूर्वी एका मुलाखतीत भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे आवाहन केले होते. हे अनौपचारिक संभाषण नवाज शरीफ यांच्या विनंतीनंतर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कठोर विधाने न केल्यामुळे शक्य झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. हे संभाषण म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधातील बर्फ वितळण्याची पहिली चिन्हे असल्याचे पाकिस्तानी वृत्तपत्राने म्हटले आहे.
पाकिस्तान सरकारच्या एका सूत्राने दावा केला की, जेव्हा शाहबाज शरीफ यांनी कोणतेही टोकदार विधान केले नाही तेव्हा जयशंकर यांनीही ते टाळले. एससीओ चार्टरनुसार शाहबाज यांनी भाषण केले. मात्र, सीमेपलीकडील दहशतवाद आणि सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे चीन आणि पाकिस्तान या दोघांनाही सुनावले.
काही दिवसांपूर्वी शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून काश्मीरबाबत अत्यंत विषारी विधान केले होते, ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले होते. इतकेच नव्हे तर, बिलावल भुट्टोंच्या विपरीत भारताचे परराष्ट्र मंत्री आपल्या वचनानुसार संपूर्ण भेटीदरम्यान सन्मानाने वागले. याआधी पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गोव्यात एससीओच्या बैठकीत आले होते, तेव्हा त्यांनी भारताविरोधात विषारी वक्तव्य केले होते. भारतानेही जोरदार प्रत्युत्तर देत दहशतवादाचा पर्दाफाश केला होता.
याबाबत पाकिस्तानी विश्लेषकांनीही बिलावल यांच्यावर टीका केली. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही देशांच्या दृष्टिकोनात झालेला हा बदल हे एक सकारात्मक विकासाचे लक्षण आहे. तथापि, आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. शाहबाज शरीफ आणि जयशंकर यांच्यातील दुसऱ्या हस्तांदोलनातही उबदारपणा दिसून आला. जयशंकर यांनी शाहबाज शरीफ आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांचे आभार मानले. एकदिवसीय दौऱ्याच्या समाप्तीनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे आभार मानले.





