Satara : विज्ञान प्रदर्शनातूनच बाल वैज्ञानिक घडतील

ठोसेघर : जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे शिवतेज माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत अडीचशेहुन अधिक शाळांनी पहिल्या दिवशीच भेटी दिल्या. ही बाब कौतुकास्पद असून विज्ञान प्रदर्शनातूनच बाल वैज्ञानिक घडतील, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले .
शिवतेज माध्यमिक विद्यालय समर्थ नगर, आरे या ठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले होत्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, संस्थेचे सचिव संभाजी महाडिक, मुख्याध्यापक कल्याण शिंदे, आर. वाय. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सतीश बुद्धे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यातील बाल वैज्ञानिक घडवण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज आहे. तालुका शिक्षण विभागाचा हा स्तुत्य उपक्रम आहे. शिवतेज माध्यमिक विद्यालय हे परळी खोऱ्यातील सर्व शाळांना मार्गदर्शन असे उपक्रम सातत्याने राबवत असते. शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा या उपक्रमांतर्गत भाग घेऊन नावलौकिक वाढवला आहे. चांगले उपक्रम राबवणारी ही शाळा आहे.सातारा तालुक्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या उपकरणांची पाहणी केली व उपकरणांचे त्यांनी कौतुक केले. गटशिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विविध उदाहरणांच्या माध्यमातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले.
वृषालीराजे भोसले यांनी विज्ञान प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांनी आणलेल्या उपकरणांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.यावेळी संस्थेचे सचिव संभाजी महाडिक, मगर, सरपंच दीपक महाडिक ,विस्तार अधिकारी शिंगाडे, गुरव, मुख्याध्यापक कल्याण शिंदे तसेच शिक्षक उपस्थित होते.





