School Holiday : दसऱ्यानिमित्त शाळांना सुट्टी जाहीर; तर २ नोव्हेंबरपासून असणार दिवाळीची सुट्टी
दसरा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा व मोठा सण असल्याने या दिवशी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सण उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे.

School Holiday : विजयादशमीनिमित्त (दसरा) मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे. सार्वजनिक सुट्ट्यांचे पालन करणे सर्व शाळांना बंधनकारक आहे.
दसरा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा व मोठा सण असल्याने या दिवशी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सण उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे.
विजयादशमीच्या निमित्ताने मिळालेल्या या सुट्टीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाळा पुन्हा बुधवारी नेहमीप्रमाणे सुरू होतील.
परिपत्रकानुसार, शासनाने घोषित केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या आणि विभागीय आयुक्तांनी निश्चित केलेल्या स्थानिक सुट्ट्या जिल्ह्यातील सर्व शाळांना लागू करणे बंधनकारक आहे.
तसेच, दसऱ्याच्या सुट्टीनंतर लगेचच विद्यार्थ्यांचे लक्ष दिवाळी सुट्टीकडे असते. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार, या वर्षी दिवाळीची सुट्टी २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत असणार आहे.
दिवाळी सुट्टीनंतर १६ नोव्हेंबर २०२६ पासून दुसरे सत्र सुरू होणार आहे. निर्णयानुसार आणि माध्यमिक शाळा संहितेच्या नियमांनुसार संपूर्ण शैक्षणिक वर्षात एकूण सुट्ट्यांचा कालावधी ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाही, याची सर्व शाळांनी दक्षता घ्यायची आहे.
तसेच, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी वर्षभरात किमान २३० कामाचे दिवस पूर्ण करणे सर्व शाळांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.





