इको क्लबला शाळांचा प्रतिसाद जेमतेम

प्रभात वृत्तसेवा
पुणे- शाळांनी इको क्लब स्थापन करावा आणि एक पेड, मा के नाम, या मोहिमेमध्ये प्रत्येक शाळेने ७० झाडे लावावी अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात राज्यातील शाळांनी याला फारसा प्रतिसाद देत नसल्याचे दिसते.
इको क्लबचा भाग म्हणून ५ जून ते ३० सप्टेबर मध्ये शाळांनी वृक्षारोपण करावे, इको क्लबची स्थापना करुन पोर्टलवर माहिती अपलोड करावी अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत. आपल्या जिल्ह्यातील माहिती अपलोड करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण परिषदेने शाळांना दिल्या होत्या. पोर्टलवरील माहितीवरुन राज्यात १४ हजार ९४७ इको क्लब स्थापन झाले आहेत. राज्यात एकुण १ लाख ८ हजार १५७ शाळा आहेत. त्याचा विचार करता इको क्लब स्थापनेचे प्रमाण केवळ १३.८२ टक्के एवढेच आहे.
एका शाळेत ७० याप्रमाणे सर्व शाळांनी एकूण ७५ लाख ७० हजार ९९० वृक्षांचे रोपण करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात ५९ हजार ८६१ शाळांनी केवळ १९ लाख ५१ हजार १३२ एवढीच झाडे लावली आहेत. वृक्षांरोपणाचे प्रमाण केवळ २५.७७ टक्के एवढेच आहे. बहुसंख्य जिल्हयांतील शाळांनी इको क्लबची स्थापन केल्याची माहिती अपलोड केलेली नाही. इको क्लब स्थापन करण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत शाळांना दिली होती. मुदतीत इको क्लब स्थापन करण्याची सूचना प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी दिली आहे.





