School Time Change: अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या उन्हाची तीव्रता आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शनिवारपासून उन्हाळ्याची सुट्टी लागेपर्यंत शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेतच भरतील. परीक्षेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य असेल. शाळा व्यवस्थापन समितीची मंजुरी घेऊन या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्याचा पारा ४० अंशांच्या पार गेला असून, सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी ‘आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५’ अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. हेही वाचा – मोदी सरकारला मोठा धक्का! महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत नामंजूर दरम्यान, सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा सर्वाधिक असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या उकाड्यासोबतच खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शीतपेये आणि उसाच्या रसाच्या गाड्यांवर गर्दी वाढत आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने हा निर्णय सर्व मुख्याध्यापकांपर्यंत त्वरित पोहोचवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.