शाळेत विद्यार्थ्याने केला गोळीबार; चार जण जखमी, टेक्सासमधील घटना

ऑस्टिन – टेक्सासमधील एका शाळेत झालेल्या भांडणांदरम्यान एका विद्यार्थ्याने गोळीबार करण्याची घटना घडली आहे. या गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत. या गोळीबारानंतर हा विद्यार्थी पळून गेला. मात्र काही वेळाने त्याला ताब्यात घेण्यात आले. टेक्सासमधील डल्लास भागातील शाळेत हा प्रकार घडला.
टिमोथी जॉर्ज सिमकीन्स असे गोळीबार करणाऱ्या 18 वर्षे वयाच्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे अर्लिंग्टन पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्याचे तीन आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. त्याला 75 हजार डॉलरचा जामिन निश्चित करण्यात आला आहे.
या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून इतर दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चौथ्या व्यक्तीलाही दुखापत झाली आहे, मात्र त्याला रुग्णालयात ठेवण्याची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्गातील किरकोळ कारणावरून हा गोळीबार झाला असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





