Annabhau Sathe Jayanti 2026: शाळा फक्त दीड दिवस, पण लेखणीतून जिंकले जग! ‘माझी मैना’ ते ‘फकिरा’… अण्णाभाऊ साठेंचा अजरामर वारसा
Annabhau Sathe Jayanti 2026 अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला.

Annabhau Sathe Jayanti 2026: १ ऑगस्ट २०२६ रोजी लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती साजरी होत आहे. केवळ दीड दिवस शाळेत जाण्याची संधी मिळालेल्या या महान साहित्यिकाने आपल्या जिद्द, अनुभव आणि असामान्य प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्याला अमूल्य योगदान दिले. औपचारिक शिक्षण कमी असले तरी जीवनाचा मोठा अनुभव आणि वाचनाची आवड यामुळे त्यांनी साहित्यविश्वात वेगळे स्थान निर्माण केले.
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. अत्यंत गरिबी, सामाजिक विषमता आणि संघर्ष यांचा सामना करत त्यांनी आयुष्य घडवले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी मुंबई गाठली. तेथे त्यांनी हमाल, मजूर, खाण कामगार, रंगकामगार, डोअरकीपर, घरगडी, तमाशातील सोंगाड्या अशा अनेक प्रकारची कामे केली. याच अनुभवातून त्यांच्या लेखणीला वास्तवाचे बळ मिळाले. (Annabhau Sathe Jayanti 2026)
अण्णाभाऊ केवळ दीड दिवस शाळेत गेले होते. मात्र, त्यांनी स्वतः वाचन करून आणि समाजाचा अभ्यास करून ज्ञान मिळवले. म्हणूनच त्यांचे साहित्य हे पुस्तकातील नव्हे, तर प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभवांचे प्रतिबिंब मानले जाते. (Annabhau Sathe Jayanti 2026)
अण्णाभाऊंनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य, नाटके, प्रवासवर्णन, चित्रपट कथा अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले. त्यांनी २१ कथासंग्रह आणि ३० हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही तयार झाले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही या कादंबरीचे विशेष कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेल्या या कादंबरीत अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या फकिरा या तरुणाची प्रेरणादायी कथा मांडली आहे. (Annabhau Sathe Jayanti 2026)

Annabhau Sathe Jayanti 2026
‘वैजयंता’ या कादंबरीत तमाशा कलावंत महिलांच्या शोषणाचा प्रश्न मांडण्यात आला, तर ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनावर आधारित महत्त्वाची कादंबरी ठरली. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत सामान्य माणूस, कष्टकरी, शोषित आणि वंचित समाज हा केंद्रस्थानी होता. (Annabhau Sathe Jayanti 2026)
अण्णाभाऊंनी साहित्याबरोबरच समाजजागृतीचेही मोठे काम केले. १९४४ मध्ये त्यांनी ‘लाल बावटा पथक’ स्थापन केले. पोवाडे, लावण्या आणि गीतांच्या माध्यमातून त्यांनी कामगार, शेतकरी आणि सामान्य जनतेपर्यंत सामाजिक व राजकीय विचार पोहोचवले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात त्यांच्या शाहिरीने जनतेत उत्साह निर्माण केला.
अण्णाभाऊंचे ‘माझी मैना’ हे गीत आजही तितकेच लोकप्रिय आहे. अनेकांना हे केवळ विरहगीत वाटते. मात्र, त्यामागे संयुक्त महाराष्ट्र चळवळीची वेदना दडलेली आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, पण बेळगाव, कारवारसारखा सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला नाही. या अपूर्णतेची सल अण्णाभाऊंच्या मनात होती. त्यातूनच ‘माझी मैना’ या गीताचा जन्म झाला. या गीतातील ‘मैना’ ही प्रतिमा सीमाभागातील मराठी जनतेचे प्रतीक मानली जाते. Annabhau Sathe Jayanti 2026
अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे रशियातही सादर केले. त्यांच्या साहित्याचे रशियन भाषेत भाषांतर झाले आणि त्यांना तेथेही सन्मान मिळाला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. १६ ऑगस्ट १९४७ रोजी शिवाजी पार्क येथे त्यांनी “ये आझादी झुठी है, देश की जनता भूखी है” अशी घोषणा देत सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. Annabhau Sathe Jayanti 2026
दीड दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाजाला नवी दिशा दिली. त्यांचे साहित्य आजही समता, स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि माणुसकीचा संदेश देत राहिले आहे. त्यामुळेच अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नसून जनतेच्या संघर्षाचे आणि परिवर्तनाचे प्रतीक म्हणून कायम स्मरणात राहतील.




