School Exam : परीक्षांच्या वेळा बदला; न्यायलयाने शाळांना दिले आदेश

नागपूर : तापमानाचा वाढता पारा पाहता नागपुर खंडपीठाने विदर्भातील शाळांच्या परीक्षा लवकर घेण्याचे आदेश संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन वेळापत्रक ठरवावे अशी माहिती दिली आहे.
संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळेस परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाने या वर्षी निर्णय घेतला होता. त्यामुळे आजवर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत विदर्भातील शाळांच्या परीक्षा संपत असताना, यावर्षी शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे विदर्भातील शाळांच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार आहेत. मात्र विदर्भातील तीव्र ऊन आणि वाढलेले तापमान पाहता संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला विदर्भातील शाळांनी तीव्र विरोध दर्शविला होता.
यासाठी शिक्षण मंत्र्यांना पत्र देखील पाठवण्यात आले होते. सोबतच उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली होती. सोमवारी उशिरा या संदर्भात न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाची परवानगी घेऊन विदर्भातील शाळांसाठी परीक्षेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करावे असे निर्देश दिले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने न्यायालयाच्या निर्देशांचा स्वागत करत विदर्भातील शिक्षण अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय करून विदर्भातील शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात सुधारणा करावी अशी मागणी केली आहे. विदर्भातील तीव्र ऊन आणि वाढलेले तापमान लक्षात घेता 15 एप्रिल च्या पूर्वी विदर्भातील शाळांच्या परीक्षा घेण्यात याव्या अशी मागणी ही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे.





