पुणे : भारत – सेंट मेरीज ज्युनिअर कॉलेज, पुण्याची १७ वर्षीय विद्यार्थिनी सायेशा राजेश गोयल हिने १२ ते १६ मे २०२५ दरम्यान लंडन, युनायटेड किंगडम येथे इंग्लिश स्पीकिंग युनियन आयोजित आंतरराष्ट्रीय पब्लिक स्पीकिंग स्पर्धेत (IPSC) भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. जगभरातील ४७ देशांमधील १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या सायेशाने भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवले. तिने कापड, भरतकाम आणि पारंपरिक विणकामांद्वारे भारताच्या विविधतेतील एकतेचे सर्जनशील सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधले. स्पर्धेदरम्यान सायेशाला लंडन भ्रमंती आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून वक्तृत्व प्रशिक्षणाचा लाभ मिळाला. उपांत्य फेरीत तिने उत्स्फूर्त भाषण आणि महात्मा गांधींच्या “खरी एकता ही तीव्र परीक्षा सहन करूनही तुटत नाही” या विधानावर आधारित भाषण सादर करत अंतिम सहा स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. १६ मे रोजी लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशन येथे अंतिम फेरीत सायेशाने शेक्सपियरच्या “We know what we are, but not what we may be” या विषयावर प्रभावी भाषण केले. तिच्या सादरीकरणाला डिप्लोमॅट्स, राजदूत आणि प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यामुळे सायेशाला उपविजेतेपद मिळाले आणि भारताचे नाव जागतिक स्तरावर उजळले. स्पर्धेनंतर भारताच्या उच्चायुक्त कार्यालयातील सौ. निधी चौधरी यांनी सायेशाची भेट घेऊन तिचे अभिनंदन केले.