Pimpri News: हिवाळा सुरू होण्यापूर्वीच जलपर्णीचा वेढा
दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी – शहरातील नद्यांच्या पात्रांना जलपर्णीने विळखा घातला असून, वाढत्या जलपर्णीमुळे नदीपात्रांचे प्रदूषण आणि पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
हिवाळ्याला सुरुवात झाली असतानाच काही ठिकाणी जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, नदीपात्रातील जलपर्णीचे वाढते प्रमाण पाहता या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
जलपर्णीमुळे नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मंदावतो. पाण्याच्या पृष्ठभागावर दाट थर निर्माण झाल्याने सूर्यप्रकाश पाण्याच्या आतपर्यंत पोहोचत नाही. परिणामी पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासे आणि इतर जलचरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो.
तसेच जलपर्णी कुजल्याने पाण्यातून दुर्गंधी पसरते. डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोकाही वाढतो. हिवाळ्यात नागरिक नदीकाठच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी येतात.
मात्र, जलपर्णीमुळे निर्माण होणारी दुर्गंधी, अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे केवळ जलपर्णी काढण्यापुरती मोहीम मर्यादित न ठेवता नदीपात्रातील प्रदूषण रोखणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि नियमित स्वच्छता राखणे आवश्यक आहे. अन्यथा दरवर्षी जलपर्णीचा विळखा कायम राहण्याची शक्यता आहे.
Pune News: आठवड्यात ९३ लाख धक्क्यांची नोंद; २४ हजार स्कूटरने उघड केली रस्त्यांची व्यथा




