फुरसुंगी – पुण्यातील मुक्काम आटोपल्यानंतरर एवढा करा उपकार ! देवा सांगा नमस्कार, असे म्हणत शहरातील भक्तांनी पालखी सोहळ्याला साश्रू नयनांनी निरोप दिला. पालखी सोहळ्याने हरिनामाच्या गजरात वरुणराजाच्या शिडकावात हडपसर येथून प्रस्थान करत भेकराईनगर, मंतरवाडी, उरुळी देवाची मार्गे वडकीनाला येथील विसाव्यावर पावणेचार वाजता पालखी सोहळा येवुन विसावला. हजारो भाविकांनी दर्शन घेतलेयानंतर पालखी सोहळा दिवेघाटातून निसर्गरम्य वातावरणात मार्गस्थ झाला. दिवेघाटातील प्रवास सगळ्या कठीण असतो. पुणे ते सासवड हा लांबचा टप्पा पार करताना अवघड अशी दिवेघाटाची वाट टाळ मृदुगांच्या गजरात भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांनी लिलया पार केली. अवघड असा दिवेघाट ११ बैलजोड्यांनी लिलया पार केला, हा सोहळा सोपानकाकांच्या सासवडनगरीच्या दर्शनाची ओढीने पुढे जात होता. घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला.