भाजपने उमेदवारी नाकारल्याने सावित्री जिंदाल अपक्ष निवडणूक लढवणार

चंदीगड : उद्योगपती आणि भाजप नेत्या सावित्री जिंदाल आज हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.त्या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. सावित्री जिंदाल हिसार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
काय लिहिले पोस्टमध्ये?
सावित्री जिंदाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलं की प्रभूच्या कृपेनं आणि आपल्या हिसारच्या कुटुंबानं मला 5 सप्टेंबरला जो आदेश दिली आहे, त्या आशीर्वादासह आज 12 सप्टेंबरला अर्ज हिसार विधानसभा मतदारसंघात विकास आणि परिवर्तनासाठी उमेदवारी अर्ज भरत आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम हाच माझा आशीर्वाद आहे.
भाजपने उमेदवारी नाकारली
सावित्री जिंदाल यांना भाजपकडून हिसार विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. मात्र, पक्षानं आरोग्यमंत्री आणि विद्यमान आमदार कमल गुप्ता यांना उमेदवारी दिली. यामुळे सावित्री जिंदाल यांनी आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
कोण आहेत सावित्री जिंदाल ?
सावित्री जिंदाल या भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या आई आहेत. देशातील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत असलेल्या सावित्री जिंदाल यांनी मार्च महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवीन जिंदाल भाजपमध्ये गेल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला होता. सावित्री जिंदाल हिसार या विधानसभा मतदारसंघात दोनवेळा पराभूत झाल्या आहेत. तर 2005 आणि 2009 ला त्या या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. हरियाणातील हुड्डा सरकारमध्ये त्या मंत्री होत्या.
हिसार येथून सावित्री जिंदाल यांचे दिवंगत पती ओ.पी. जिंदल आमदार होते. हरियाणा सरकारमध्ये देखील मंत्री होते. सावित्री जिंदाल हिसारच्या जागेवर 2014 च्या निवडणुकीत कमल गुप्ता यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. 2019 ला काँग्रेसनं या जागेवर उमेदवार बदलला होता. राम निवास सारा यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी देखील कमल गुप्ता यांनी विजय मिळवला होता.





