CJP : तिहार जेलमध्ये सौरभ दास आणि आशुतोष रांका वेगवेगळ्या बराकीत; काय आहे कारण?
CJP : जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव दोघांना तिहार तुरुंगात वेगवेगळ्या बराकीत ठेवले आहे.

CJP : दिल्लीतील जंतर-मंतर येथे पोलिसांच्या कामात अडथळा आणणे आणि शांतता भंग केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) सदस्य सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव दोघांना वेगवेगळ्या बराकीत ठेवण्यात आले आहे. सौरभ दास याला तुरुंग क्रमांक दोनमध्ये, तर आशुतोष रांका याला तुरुंग क्रमांक चारमध्ये ठेवण्यात आले आहे.
जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे कारवाई
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १३ ऑक्टोबर रोजी सौरभ दास, आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या जंतर-मंतर परिसरात प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. यानंतर १४ जणांना ताब्यात घेण्यात आले.
अजिंक्य शिंदे यांची सुटका –
या प्रकरणातील सहकारी अजिंक्य शिंदे याला सहा महिने शांतता राखण्याच्या आणि चांगले वर्तन करण्याच्या अटीवर पाच हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले.
पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन पुन्हा होण्याची आणि इतरांना चिथावणी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या कारवाईवर टीका केली असून, जंतर-मंतरवर तिरंगा फडकवणे हाच त्यांचा गुन्हा आहे का, असा सवाल केला आहे.





