दुबई : सौदी अरेबियाचे ग्रॅन्ड मुफ्ती शेख अब्दुलअजीज बिन अब्दुल्लाह अल शेख यांचे आज निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. सौदीचे राजे सलमान यांच्या देखरेखीखाली सौदीच्या दैनंदिन प्रशासनाची जबाबदारी सांभाळणारे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री ग्रॅन्ड मुफ्ती शेख अब्दुलअजीज यांचा दफनविधी पार पडला. शेख अब्दुलअजीज यांनी जवळपास पाव शतकापेक्षा जास्त कालावधीसाठी सौदीच्या राजघराण्याचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून जबाबदारी सांभाळली होती. सौदीचे ग्रॅन्ड मुफ्ती या नात्याने शेख अब्दुलअजीज हे सुन्नी मुस्लिम विश्वातील सर्वोच्च मौलवी होते. मुस्लिमांचे सर्वोच्च धार्मिकस्थळ मक्का आणि मदिना सौदी अरेबियामध्येच आहे. या शहरांची यात्रा करण्यासाठी जगभरातून लाखो हाजी तेथे हजच्या यात्रेसाठी येत असतात. आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करणे प्रत्येक मुस्लिमासाठी आवश्यक मानले जाते. त्या सर्वांना ग्रँड मुफ्तींच्या घोषणांचे अधिक बारकाईने पालन करणे आवश्यक असते. सौदी अरेबियाचे ग्रॅन्ड मुफ्ती म्हणून त्याच्या कारकिर्दीमध्येच सौदी अरेबियाचे रुपांतर अतिसंवेदनशील मुस्लिम देशातून सामाजित उदारमतवादी देशामध्ये झाले होते. सौदीच्या अल सौद राजघराण्याशी शेख अब्दुलअजीज यांचे अत्यंत निकटचे संबंध होते. राजघराण्याच्या परवानगीने महिलांना अलिकडच्या काही वर्षात वाहन चालवणे, सिनेमागृहांमध्ये जाण्यासारखी सामाजिक उदारमतवादी भूमिकेतून परवानगी दिली गेली आहे. शेख अब्दुलअज यांनी अस्लामिक स्टेट आणि अल-कायदासारख्या कट्टरवादी संघटनांचा निषेध केला होता. तरुणपणीच ग्रॅन्ड मुफ्ती म्हणून जबाबदारी तरुणपणीच अंध झालेले अब्दुलअजीज यांना १९९९ साली सौदीचे तत्कालिन राजे फहाद यांनी सौदीचे ग्रॅन्ड मुफ्ती म्हणून नियुक्त केले. प्रारंभीच्या काळात त्यांनी मोबाईलच्या वापरालाही विरोध केला होता. ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप बेनेडिक्ट १४ वे यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. ख्रिश्चन चर्चबद्दलही त्यांनी आक्रमक भूमिका मांडल्याने त्यांचे विचार सांप्रदायिक मानले जाऊ लागले होते. मात्र न्यूयॉर्कवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी कट्टरवादी संघटनांच्या विरोधात भूमिका घेतली होती. पण राजे सलमान आणि युवराज मोहम्मद यांच्या उदयामुळे शेख अब्दुलअझीझ यांनी त्यांचा सामाजिक दृष्टिकोन सौम्य केला होता.