सौदी अरेबियाच्या ‘त्या’ नागरिकाला जामीन !

पुणे : पुणे स्टेशनवर महिला कर्मचाऱ्याचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात सौदी अरेबियाच्या नागरिकाला सत्र न्यायाधीश एस.पी.पिंगळे यांनी 20 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.
वाझ रखन मेहेर (वय 27) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. याबाबत 53 वर्षीय महिला पोलीस हवालदाराने पुणे लोहमार्ग पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 18 मार्च रोजी दुपारी 2.45 च्या सुमारास स्टेशन परिसरात घडली .
सरकारी कामात अडथळा आणून त्याने फिर्यादींना मारहाण केली. रेल्वे मदत केंद्रावरील बी.व्ही.जी. कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याला गालावर मारून, गळा दाबून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. तपासामध्ये ढवळाढवळ करायची नाही, न्यायिक क्षेत्र सोडून बाहेर जायचे नाही आणि पासपोर्ट जमा करायच्या अटीवर हा निकाल देण्यात आला आहे.





