सत्यजितसिंह पाटणकर भाजपात! उदयनराजेंची तुफान फटकेबाजी, म्हणाले बच्चू, बच्चू म्हणून डच्चू देऊ नका!

Satyajitsinh Patankar | Udayanraje | आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा होत असतानाच, पश्चिम महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडली. पक्षाचे दोन महत्त्वाचे शिलेदार, सत्यजितसिंह पाटणकर (सातारा) आणि वैभव पाटील (सांगली) हे भाजपात प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आणि शरद पवार यांना जोरदार धक्का बसला आहे.
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील प्रभावशाली नेते सत्यजितसिंह पाटणकर हे आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा केली जात आहे. बच्चू, बच्चू म्हणून डच्चू देऊन बाजूला सारू नका म्हणजे झालं, असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. यावेळी सभागृहात एकच हशा पिकाला होता. उदयनराजे यांनी केलेल्या राजकीय फटकेबाजीची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात केली जात आहे.
या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना खासदार उदयनराजे यांनी राजकीय विधाने करत तुफान फटकेबाजी केली. आपल्या जिल्ह्याला न्याय देण्याचा खरा प्रयत्न कोणी केला असेल, तर भाजपने केला असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. तसेच भाजप हा पक्ष नाही तर कुटुंब आहे, असे देखील ते म्हणाले.
शरद पवारांवर साधला निशाणा
पहिले लोकं दगडाला शेंदूर लावला की निवडून द्यायचे, आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र हा आता कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. हा फक्त भाजपचा किल्ला झाला आहे, असे म्हणते बालेकिल्ला म्हणत लोकांना विकास कामांना वंचित ठेवलं असे म्हणत उदयनराजे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
सांगलीतील धक्का : वैभव पाटील भाजपच्या वाटेवर
विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि माजी आमदार सदाशिव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील हे देखील लवकरच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने सांगलीतील राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे.





