Satya Nadella : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची पगारवाढ ! आकडा ऐकून बसेल धक्का

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नडेला यांच्या पगारात कंपनीने विक्रमी वाढ केली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये नडेला यांना 96.5 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 846 कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळालं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील मायक्रोसॉफ्टच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर नडेला यांच्या पगारात तब्बल 22 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यासोबतच कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी तेजी दिसून आली आहे.
मायक्रोसॉफ्टच्या वार्षिक अहवालानुसार, सत्या नडेला यांचं 2025 चं पॅकेज 96.5 मिलियन डॉलर आहे, जे गेल्या वर्षीच्या 79.1 मिलियन डॉलर (सुमारे 694 कोटी रुपये) पॅकेजच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते. या पॅकेजपैकी 90 टक्के हिस्सा शेअर्सच्या स्वरूपात आहे, तर नडेला यांचं बेसिक वेतन 2.5 मिलियन डॉलर आहे, जे एकूण पगाराच्या फक्त 10 टक्के आहे. उर्वरित रक्कम ही शेअर्स आणि इन्सेंटिव्हच्या स्वरूपात देण्यात आली आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी नडेला यांचं पॅकेज 79.1 मिलियन डॉलर होतं. यंदा 22 टक्क्यांची वाढ करत ते 96.5 मिलियन डॉलरवर पोहोचलं आहे. ही वाढ मायक्रोसॉफ्टच्या AI क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचं प्रतिबिंब आहे. कंपनीने सांगितलं की, सत्या नडेला यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्टने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. OpenAI मधील गुंतवणूक आणि Copilot सारख्या AI सेवांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे कंपनीने या क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
सत्या नडेला 2014 पासून मायक्रोसॉफ्टचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन उंची गाठली आहे. AI तंत्रज्ञानातील यश आणि कंपनीच्या शेअर्समधील वाढ यामुळे नडेला यांच्या पगारात झालेली ही विक्रमी वाढ त्यांच्या योगदानाचं बक्षीस मानलं जात आहे. या घडामोडींमुळे मायक्रोसॉफ्टच्या भविष्यातील रणनीती आणि नडेला यांच्या नेतृत्वाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




