Korea Open 2023 : सात्विक-चिरागने रचला इतिहास

योओसु सी (दक्षिण कोरिया) :- भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी व त्याचा अव्वल जोडीदार चिराग शेट्टी यांनी रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्या या सर्वात मानांकित जोडीने कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद प्राप्त केले.
या जोडीने अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि महंमद रियान अर्दियांटो या जोडीचा 17-21, 21-13, 21-14 असा पराभव केला व करंडकावर नाव कोरले.
या जोडीच्या कारकिर्दीतील सुपर 500 स्पर्धेचे हे तिसरे विजेतेपद ठरले आहे. यापूर्वी या जोडीने 2019 साली थायलंड ओपन, 2022 साली इंडिया ओपन जिंकली होती. मात्र, कोरिया ओपनचे हे त्यांचे पहिलेच विजेतेपद ठरले आहे.
अंतिम लढतीत या जोडीने पहिला गेम गमावला. मात्र, त्यांनी दुसरी गेम सुरू झाल्यावर अफलातून रिटर्न व व्हॉलीचा खेळ करत वर्चस्व गाजवले. हा गेम जिंकत त्यांनी सामन्यात बरोबरी केली. तिसरी गेमही त्यांनी थायलंडच्या जोडीला दडपणाखाली ठेवत जिंकली व विजेतेपदावर मोहोर उमटवली. या विजयानंतर दोघांनीही त्यांचा प्रसिद्ध गंगनम स्टाइलमध्ये डान्स करत आपला आनंद साजरा केला.
यंदाच्या मोसमात अफलातून यश…
यापूर्वी सात्विक आणि चिरागने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच थॉमस करंडक स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. या जोडीने जागतिक स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले होते.
याबरोबरच या जोडीने सय्यद मोदी, स्विस ओपन, थायलंड ओपन, इंडिया ओपन, सुपर 750 फ्रेंच ओपन या स्पर्धांमध्येही विजेतेपद मिळवताना आगामी पॅरिस ऑलिम्पिक पदकाचा विश्वासही दिला आहे.





