Satish Bhosale : खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकील म्हणाले, ‘सतीश राजकारणाचा बळी ठरला’

बीड : मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला शुक्रवारी प्रयागराजवरुन छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आले. त्यानंतर खोक्या भाईला शिरुर-कासार येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीअंती न्यायालयाने सतीश भोसले (Satish Bhosale) याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता 20 मार्चपर्यंत खोक्याचा मुक्काम पोलीस कोठडीत असेल.
बॅटने अमानुष मारहाण आणि ढाकणे पिता पुत्रांना मारहाण प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले शिरूर मधून फरार झाला होता. पुणे- अहिल्यानगर -संभाजीनगर – जबलपूर मार्गे प्रयागराज गाठले. बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. त्यानंतर आज प्रयागराज येथून विमानाने सकाळी संभाजीनगर येथे आणण्यात आले.
संभाजीनगर वरून शिरूर पोलीस ठाण्यात घेऊन आल्यानंतर अटकेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सतीश भोसले ला न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यामुळे सतीश भोसले चा मुक्काम सात दिवस पोलीस कोठडी मध्ये असणार आहे.
खोक्याचे वकील अंकुश कांबळे यांनी कोणते मुद्दे मांडले ?
सुनावणीवेळी सतीश भोसलेचे वकील अंकुश कांबळे यांनी मोठे दावे केले आहेत. सतीश भोसले हा राजकारणाचा बळी ठरला असल्याचा आरोप अंकुश कांबळे यांनी केला आहे. एखाद्या मागासवर्गीय व्यक्तीने आमदाराचा कार्यकर्ता होऊ नये का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामध्ये सध्या जातीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
सतीश भोसले हा सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गरीब मुलांना वह्या व पुस्तकांचे वाटप, उस तोड कामगारांना रेशन तसेच धान्य पुरवणे, गरिबांना मदत करणे अशी कामे सतीश भोसले हा करत असतो. त्याचे चांगली काम समोर आणली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र त्याच्या भोवती खोटे आरोप केले जात असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसले याच्यावर काढला जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
सतीश भोसले याच्या प्ररकणात वड्याचे तेल वांग्यावर निघाले आहे. सतीश भोसले यांचे घर तोडले गेले, ते कुणालाही मान्य होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर शुक्रवारी होळीच्या दिवशी अज्ञात व्यक्तीने सतीश भोसले यांचे घर पेटवून दिले होते. यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू जाळण्यात आल्या असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. इतकेच नाही तर या ठिकाणी असलेल्या महिलांना देखील मारहाण केली असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
पोलिसांनी खोक्याची रिमांड मागताना न्यायालयात कोणते मुद्दे मांडले?
सतीश भोसलेची रिमांड मागताना पोलिसांनी मोठे मुद्दे मांडले. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून यात या आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग आहे. यावेळी मारहाण करताना कुऱ्हाड आणि सत्तुर जप्त करायची आहे. त्यासाठी या आरोपीची आम्हाला पोलीस कस्टडी हवी आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे इतर गुन्हेगारांशी काही संबंध येत आहे का, हे तपासायचे आहे. सदर गुन्हा हा शारीरिक व गंभीर स्वरूपाचा असून सदर गुन्ह्यात आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची तक्रार असल्याने पुण्यामध्ये वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची कार तपासणी कामी जप्त करायचे आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यातील सर्व आरोपी फरार आहेत. आरोपी फरार असताना त्याला फरार होण्यासाठी कोणी कोणी मदत केली याचा तपास करायचा आहे. याव्यतिरिक्त नमूद गुन्ह्यात आरोपीच्या सहभागाची सखोल चौकशी करायची आहे म्हणून पोलीस कस्टडी हवी आहे, असे मुद्दे पोलिसांकडून मांडण्यात आले.
खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी –
आम्हाला पोलिसांची कायेदशीर चौकशी मान्य आहे. पण बुलडोझरने आमचे घर पाडणे योग्य नव्हते. आमचं घर पाडल्यानंतर चार-पाच दिवसांनी ते पेटवून देण्यात आल्याची बातमी समोर आली. त्यामुळे आम्ही आज इतक्या तातडीने शिरुर-कासार या गावात आलो. घर पेटवून देताना घरातील लहान मुलींनाही मारण्यात आले, त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे आता सरकारने आम्हाला न्याय मिळून द्यावा, अशी मागणी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या बहिणीने केली.





